थायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉइडिज्म हा एक हार्मोनल विकार आहे; ज्यामध्ये तुमच्या थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉईड तयार करत नाहीत किंवा गरजेपेक्षा जास्त थायरॉईड तयार करतात. यामुळे महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी, वजनवाढ, ओव्यूलेशन समस्या निर्माण होतात आणि गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. पण काळजी करण्याचे कारण नाही.
थायरॉईड चे कमी किंवा जास्त प्रमाण गर्भधारणेत अडचणी निर्माण करतात. शिवाय अनुपचारित थायरॉईड मुळे माता आणि गर्भाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या लेखात, आपण थायरॉईड कार्य आणि गर्भधारणा यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांचा शोध घेऊयात. याशिवाय गर्भधारणेतील थायरॉईड आणि संभाव्य धोके, तसेच थायरॉईड च्या संतुलनासाठी काय काळजी घ्यावी आणि थायरॉईडसह गर्भधारणेसाठी कोणते उपचार पर्याय उपलब्ध आहेत यांविषयी जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
Table of Contents
थायरॉईड म्हणजे काय?
मानेच्या भागात फुलपाखराच्या आकाराच्या दोन थायरॉईड ग्रंथी असतात. या ग्रंथींच्या कार्यात बिघाड झाल्यास थायरॉईड हार्मोन चे असंतुलन होते आणि विविध समस्या निर्माण होऊन गर्भधारणेवर परिणाम करतात. ट्रायओडोथायरोनिन (T3) आणि थायरॉक्सिन (T4) हे थायरॉईड बनवणारे मुख्य हार्मोन आहे.
हायपो-थायरॉइडिज्म म्हणजे काय? त्याचा गर्भधारणेवर होणारा परिणाम
थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉईड तयार करीत नाहीत. याला हायपोथायरॉईड किंवा अंडरएक्टिव्ह थायरॉईड देखील म्हणतात.
गर्भाच्या विकासासाठी थायरॉईड संप्रेरके महत्त्वाचे असतात. हे हार्मोन्स बाळाचे मेंदू आणि मज्जासंस्था विकसित करण्यास मदत करतात. बाळाच्या विकासादरम्यान गर्भाला पुरेसे थायरॉईड हार्मोन उपलब्ध न झाल्यास, मेंदूचा योग्य विकास होऊ शकत नाही आणि व्यंग निर्माण होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान हायपोथायरॉईडीझमवर उपचार न केल्यास किंवा अपुरे उपचार न केल्यास गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूती यांसारख्या गुंतागुंत होऊ शकतात. याशिवाय गर्भाच्या हृदयाचे ठोके वाढणं, गर्भाची वाढ खुंटणं, मृत मूल जन्माला येणं, बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होणं, नवजात अर्भकाला हायपरथायरॉईडीझम होणं असे संभाव्य धोके दिसून येऊ शकतात.
पुरुषांमधील हायपो-थायरॉइडिज्म मुळे टेस्टेस्टेरॉन या सेक्स हार्मोन ची पातळी कमी होते आणि इरेक्शन समस्या निर्माण होऊन गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.
लक्षणे : हायपोथायरॉइडिज्म मुळे चयापचय क्रिया मंदावते, थकवा, वजनवाढ, शरीर थंड होणे, पायांना सूज येणे, आळस येणे, भूक मंदावणे अशी लक्षणे उद्भवतात. सोबतच पाळीमध्ये बदल होतात आणि गर्भधारणेत समस्या निर्माण होतात.
कारणे : पिट्युटरी ग्रंथीचे विकार, आघात, हाशिमोटो रोग, ऑटोइम्युन डिसऑर्डर, अनुवांशिक कारणांमुळे हायपो-थायरॉइडिज्म होतो.
हायपर-थायरॉइडज्म म्हणजे काय? त्याचा गर्भधारणेवर होणारा परिणाम
हि अशी स्थिती आहे जिथे थायरॉईड ग्रंथी उच्च पातळीचे थायरॉईड हार्मोन तयार करतात. याला हायपर-थायरॉईड किंवा ओव्हरएक्टिव्ह थायरॉईड देखील म्हणतात.
काही अभ्यासकांना हायपरथायरॉईडीझम असलेल्या महिलांमध्ये गर्भधारणा-प्रेरित उच्च रक्तदाब (प्रिक्लेमसिया) दिसून आला आहे. सोबतच मुदतपूर्व प्रसूती आणि बाळाचे ‘लो बर्थ वेट’ दिसून आलेले आहेत. थायरॉईड स्टॉर्म हा हायपरथायरॉईडीझमचा एक गंभीर, जीवघेणा प्रकार असून यामुळे गर्भधारणेत गुंतागुंत होऊ शकते.
थायरॉईड कार्य इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन सारख्या रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन सोबत जोडलेले असते. हायपरथायरॉईड चा थेट परिणाम अंडाशयांच्या कार्यावर होतो, मासिक पाळी अनियमित होते आणि वंध्यत्व येते. हायपरथायरॉईडीझममुळे प्रोलॅक्टिन हार्मोनचे उत्पादन वाढते. उच्च प्रोलॅक्टिन पातळी अंडाशयांना स्त्रीबीज सोडण्यापासून रोखते आणि वंध्यत्व येते.
एखाद्या व्यक्तीला हायपरथायरॉईडीझम असताना गर्भधारणा होऊ शकते, परंतु हा विकार गर्भधारणा अधिक आव्हानात्मक बनवू शकतो आणि गर्भधारणेची शक्यता कमी करू शकतो. अभ्यासानुसार, हायपरथायरॉईडीझम असलेल्या 5.8% महिलांमध्ये वंध्यत्व समस्या दिसून आलेली आहे.
लक्षणे : आहार सामान्य असूनही वजन कमी होते, अतिसार, चिंतातूरता निर्माण होणे, हात व पाय थरथरणे, उष्णतेचा खूप त्रास होणे, स्वभावात तीव्र चढ-उतार, स्लीप अप्निया (झोपेत श्वसन बंद होणे), हृदयाच्या ठोक्यांची गती कमी-अधिक होणे, दृष्टी धुसर होणे, मेंटल फॉग (विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे) अशी लक्षणे हायपरथायरॉइडिज्म मध्ये दिसून येतात.
कारणे : आयोडीन ची कमी, थायरॉईड इंफ्लेमेशन, थायरॉईड ग्रंथीतीतील गाठ, ऑटोइम्युन डिसऑर्डर, अनुवांशिक आजार यांमुळे हायपरथायरॉईड होऊ शकतो.
थायरॉइडचे निदान
- फिजिकल एक्सामिनेशन : डॉक्टर प्रथम तुमची लक्षणे, लक्षणांची तीव्रता आणि वैद्यकीय इतिहास तपासतील.
- ब्लड टेस्ट : निदान करण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन थायरॉईड तयार करणाऱ्या TSH, T3 आणि T4 हार्मोन चे प्रमाण मोजत.
- रेडिओऍक्टिव्ह आयोडीन अपटेक टेस्ट (RAIU)इमेजिंग टेस्ट : नोड्यूल ओळखण्यासाठी अल्ट्रासाउंड सारख्या इमेजिंग टेस्ट केल्या जातात.
थायरॉईड असल्यास गर्भधारणेसाठी उपचार
१) हायपोथायरॉईड साठी उपचार :
हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) आणि लेव्होथायरॉक्सिन या ओरल मेडिकेशन चा वापर केला जातो. त्यापूर्वी डॉक्टर तुमच्या गळ्याची सूज तपासतील व अन्य फिजिकल एक्सामिनेशन करतील.
२) हायपरथायरॉईड चे उपचार :
- अँटीथायरॉइड औषधे, किरणोत्सर्गी आयोडीन, बीटा ब्लॉकर्स आणि शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले जाऊ शकतात.
- रेडिओआयोडीन उपचार : यामध्ये किरणोत्सर्गी आयोडीन ची औषधे समाविष्ट आहेत. यामुळे थायरॉईड संप्रेरक तयार करणार्या थायरॉईड पेशी नष्ट होतात आणि थायरॉईड नॉर्मल होतो.
- थायरॉइडेक्टॉमी सर्जरी : गंभीर स्थितीत या शस्त्रक्रियेचा वापर करून डॉक्टर तुमच्या ग्रंथी काढून टाकतात. पण यामुळे हायपोथायरॉईड होण्याचा धोका असतो. त्यासाठी सर्जरीनंतर कायम पथ्ये पाळावी लागतात.
- बीटा ब्लॉकर्स : ही औषधे शरीरावर थायरॉईड संप्रेरकांची क्रिया रोखतात. यामुळे थायरॉईड नियंत्रित होत नाही पण लक्षणे कमी होतात.
ओव्यूलेशन इंडक्शन :
मेडिसिन देऊन थायरॉईड ची मात्रा संतुलित केल्यानंतर गर्भधारणेची शक्यता वाढते. परंतु मासिक पाळी अनियमित असेल किंवा ओव्यूलेशन अनियमित होत असेल तर ओव्यूलेशन इंडक्शन हा चांगला उपचार पर्याय आहे. यामध्ये डॉक्टर तुम्हाला अंडाशय उत्तेजित करणारी औषधे आणि इंजेक्शन देतात. यामुळे अनेक स्त्रीबीजे विकसित होतात. अल्ट्रासाउंड च्या मदतीने डॉक्टर ओव्यूलेशन काळ ओळखतात आणि तुम्हाला संबंध ठेवण्यास सांगतात. अशा पद्धतीने गर्भधारणा होऊ शकते.
आययूआय :
थायरॉईड नियंत्रित करूनही गर्भधारणेत अडचणी येत असतील तर डॉक्टर तुम्हाला डॉक्टर IUI उपचार सुचवतील. आययूआय ने नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा १०-१५ टक्के गर्भधारणेची शक्यता वाढते.
आधुनिक ART उपचार :
फर्टिलिटी क्लिनिक मध्ये तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराचा डिटेल स्टडी केला जातो. वंध्यत्वाचे अचूक निदान केले जाते. थायरॉईड सह आणखी वंध्यत्व समस्या असतील किंवा अधिक वजन, अधिक वय असेल तर तुमच्यासाठी IVF, ICSI, IMSI, PICSI, LAH, ब्लास्टोसिस्ट असे अनेक उपचार पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे निश्चितरित्या गर्भधारणा होऊ शकते.
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न
कमी सक्रिय थायरॉईड (हायपोथायरॉईडीझम) गर्भधारणेवर कसा परिणाम करते?
गर्भधारणेदरम्यान हायपोथायरॉईडीझममुळे प्रीक्लॅम्पसिया, ऍनिमिया, अकाली जन्म आणि कमी वजन यासारख्या विविध गुंतागुंत होऊ शकतात. हे धोके कमी करण्यासाठी योग्य औषधोपचार आणि नियमित निरीक्षणाद्वारे हायपोथायरॉईडीझमचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.
हायपरथायरॉईडीझमचा गर्भाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो का?
होय. अनुपचारित हायपरथायरॉईडीझममुळे बाळामध्ये मुदतपूर्व जन्म, कमी वजन आणि अगदी थायरॉईड समस्या यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात. गर्भवती महिलांनी हे धोके कमी करण्यासाठी योग्य औषधोपचार आणि नियमित निरीक्षणाद्वारे हायपरथायरॉईडीझम चे व्यवस्थापन करावे.