वय आणि फर्टिलिटी यांचा संबंध
आपण वयाने मोठे होतो तसतशी आपली फर्टिलिटी क्षमता नैसर्गिकरित्या कमी होत जाते. याचे कारण असे की स्त्रिया त्यांच्या अंडाशयात एका निश्चित संख्येने स्त्रीबीजे घेऊन जन्माला येतात. या साठ्याव्यतिरिक्त नव्याने स्त्रीबीजे कधीही बनत नाहीत. फर्टिलिटी वयात दर महिन्याला या स्त्रीबीजांची वाढ होते आणि ती गर्भधारणेसाठी तयार होतात. या काळात स्त्रीबीजांचा शुक्राणूंशी संबंध आला तर गर्भधारणा होते. अन्यथा मासिक पाळी सुरु होते. या प्रक्रियेमुळे वाढत्या वयानुसार स्त्रीबीजे हळूहळू कमी होतात. या स्त्रीबीजांचा दर्जा कालांतराने कमी होऊ लागतो. ज्यामुळे गर्भधारणा करणे आव्हानात्मक आणि कठीण होते.
पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक काळ फर्टाईल राहतात. परंतु वाढत्या वयानुसार त्यांच्या शुक्राणूंची क्वालिटी देखील कमी होऊ लागते. ४५ व्या वयात पुरुषांच्या वीर्यात मोठी घट होते. त्यामुळे पुरुषांसाठी देखील अधिक वयातील गर्भधारणा आव्हानात्मक होऊन बसते.
फर्टिलिटी वय म्हणजे काय?
फर्टिलिटी वय याला प्रजनन वय, पुनरुत्पादक वय किंवा रिप्रॉडक्टिव्ह एज असेही म्हणतात. जेव्हा एक महिला आणि पुरुष बाळाला जन्म देण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तयार असतात तेव्हा त्याला फर्टिलिटी वय म्हणतात. सर्वोत्तम फर्टिलिटी वयात महिलांची स्त्रीबीजे आणि पुरुषांचे शुक्राणू सर्वात निरोगी असतात आणि तुम्हाला गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते.
गर्भधारणेसाठी सर्वोत्तम वय
गर्भधारणा केव्हा करावी हा जोडप्यांचा वैयक्तिक निवडीचा विषय आहे. आजकाल अनेक स्त्रिया-पुरुष करियर ला प्राधान्य देत आहेत आणि सेटल झाल्यानंतर बाळाचा विचार करत आहेत. ३५ वयानंतर गर्भधारणा करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. वाढत्या वयात यशस्वी गर्भधारणेसाठी आणि स्वस्थ बाळाच्या जन्मासाठी फर्टिलिटी उपचारांची गरज लागू शकते; पण निश्चितपणे गर्भधारणा होऊ शकते. क्रायोप्रिझर्वेशन, IVF, ICSI आणि LAH यासारख्या आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी वाढत्या वयातही गर्भधारणा करणे शक्य झाले आहे.
- स्त्रियांचे सर्वोत्तम फर्टिलिटी वय : साधारणतः स्त्रियांचे फर्टिलिटी वय १८ ते ३५ मानले जाते. २० वयात स्त्रिया सर्वाधिक फर्टाईल असतात. परंतु इतर घटकही फर्टिलिटी वर परिणाम करू शकतात, जसे कि, वजन, रिप्रॉडक्टिव्ह समस्या, इतर आजार, जीवनशैली इ.
- पुरुषांचे सर्वोत्तम फर्टिलिटी वय : पुरुष २५ ते २९ वयात सर्वाधिक फर्टाईल असतात असे मानले जाते. महिलांच्या तुलनेत पुरुषांची फर्टिलिटी क्षमता अधिक असते. ते आयुष्यभर शुक्राणूंची निर्मिती करत राहतात. परंतु हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि, या शुक्राणूंची गुणवत्ता वयाबरोबर हळूहळू कमी होत जाते. खराब गुणवत्तेच्या शुक्राणुंमुळे बाळात अनुवांशिक विकार होण्याची शक्यता बळावते.
वाढत्या वयात गर्भधारणेतील आव्हाने
- लो ओवरियन रिझर्व्ह : स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी होते.
- अनियमित मासिक पाळी : अनेक कारणांमुळे मासिक पाळी अनियमित होते.
- बाळामध्ये अनुवांशिक विकारांचा धोका : DNA डॅमेज किंवा क्रोमोझोमल विकृती मुळे बाळात अनुवांशिक विकारांची संभावना वाढते.
- एम्ब्रियोची लो क्वालिटी : कमी गुणवत्तेचे शुक्राणू आणि स्त्रीबीजांमुळे एम्ब्रियो कमी दर्जाचा एम्ब्रियो बनतो आणि गुंतागुंत होऊ शकते.
- एम्ब्रियो इम्प्लांटेशन समस्या/ मिसकॅरेज : वाढत्या वयात मिसकॅरेज चा धोका वाढतो.
- प्री टर्म बर्थ किंवा लो बर्थ वेट.
वयानुसार गर्भवती होण्याची शक्यता
- २० वयाच्या सुरुवातीच्या आणि मधल्या काळात स्त्रिया सर्वाधिक फर्टाईल असतात. या काळात नैसर्गिक गर्भधारणा होण्याची शक्यता प्रत्येक मासिक पाळी चक्रासाठी २५% असते.
- साधारण २५ वयापर्यंत स्त्रियांची फर्टिलिटी क्षमता चांगली असते.
- ३० वयात नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता १५ ते २० % असते.
- ३५ वयानंतर फर्टिलिटी क्षमतेत विलक्षण घट होऊ लागते.
- ४० वयात प्रत्येक मासिक पाळी चक्रात गर्भधारणा होण्याची शक्यता फक्त ५% असते.
फर्टिलिटी क्षमतेतील ही घसरण प्रामुख्याने वयानुसार स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी झाल्यामुळे होते. अधिक वयात तुम्हाला गर्भधारणेत अडचण येत असल्यास किंवा गर्भधारणेत आव्हाने व जोखीम असल्यास फर्टिलिटी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या.
वयानुसार आयव्हीएफ यश दर
जेव्हा आयव्हीएफ यश दराचा विचार केला जातो तेव्हा वय मोठी भूमिका बजावते. साधारणपणे सांगायचे तर, वृद्ध स्त्रियांच्या तुलनेत तरुण स्त्रियांचा IVF सह यशाचा दर जास्त असतो.
सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (SART) ने सन 2021 मध्ये ‘वयानुसार बदलणारा IVF सक्सेस रेट’ सादर केला आहे. त्यानुसार,
- ३५ हुन कमी वय असल्यास : ४४.०५%
- ३५ ते ३७ वयात : ३२.०४%
- ३८ ते ४० वयात : २०.०२%
- ४१ ते ४२ वयात : ९.०६%
- ४२ हुन अधिक वयात : २.०९%
तथापि, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे आणि वैयक्तिक घटक देखील IVF च्या यशाच्या शक्यतांवर परिणाम करू शकतात. जर तुम्ही प्रगत वयात IVF वापरण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या विशिष्ट परिस्थितीबद्दल आणि तुमच्या वयानुसार तुमच्या यशाची शक्यता सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता याबद्दल चर्चा करा.
४0 नंतर प्रजनन क्षमता
४० वयातील गर्भधारणेला ‘ऍडव्हान्स मॅटर्नल एज किंवा प्रगत वयातील गर्भधारणा म्हणतात. जेव्हा तुम्ही ४० वयात गर्भधारणेचा निर्णय घेता तेव्हा हे समजून घ्या कि आता गोष्टी २० व्या वर्षाइतक्या सोप्या नसतील. तुम्हाला या वयात डायबेटिज, ब्लड प्रेशर सारखे आजार असू शकतात. रिप्रॉडक्टिव्ह अवयवांशी संबंधित गुंतागुंत होऊ शकते. शिवाय या वयात मेनोपॉज च्या सुरुवातीचा टप्पा पेरी-मेनोपॉज ची सुरुवात होते. हार्मोनल इम्बॅलन्स सह मासिक पाळी समस्या अशी अनेक लक्षणे दिसू लागतात आणि गर्भधारणा आव्हानात्मक होते. अशातच गर्भधारणेची आव्हाने कमी करण्यासाठी फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
४० वयात तुम्ही जर नैसर्गिक गर्भधारणेचा प्रयत्न करीत असला, तर दर मासिक पाळी चक्रात गर्भधारणेची शक्यता केवळ ५% असते. IVF उपचारांनी हि शक्यता २०-२१% पर्यंत वाढते. ICSI, LAH सह PGD, PGS सारख्या आधुनिक फर्टिलिटी उपचारांमुळे मिसकॅरेज चा धोका कमी होतो आणि स्वस्थ बाळाच्या जन्माची शक्यता वाढते.
सतत विचारले जाणारे प्रश्न :
फर्टिलिटी ट्रीटमेंट वय-संबंधित वंध्यत्व समस्यांवर मात करण्यास कशी मदत करतात?
IVF किंवा IVF-ICSI/IMSI/PICSI उपचारांनी गर्भधारणेची शक्यता वाढते. इम्प्लांटेशन समस्या असल्यास LAH-लेजर असिस्टेड हॅचिंग फायदेशीर ठरते. तर मिसकॅरेज टाळण्यासाठी आणि स्वस्थ बाळाची संभावना वाढवण्यासाठी प्री – इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) सारखे आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत.
प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का?
स्त्रियांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी ‘क्रायोप्रिझर्वेशन’ हा प्रभावी पर्याय आहे. या पद्धतीचा वापर करून स्त्रीबीजे गोठवून ठेवता येतात. गर्भधारणा करायचे असेल तेव्हा गोठवून ठेवलेल्या स्त्रीबीजांचा वापर करून IVF द्वारे गर्भधारणा करू शकतात.
मेनोपॉज चा स्त्रीच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो?
मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या फर्टिलिटी क्षमतेचा शेवट दर्शवते. स्त्रीबीजे संपतात आणि अंडाशये स्त्रीबीजे सोडण्याची प्रक्रिया थांबवतात. ४० वयात मेनोपॉज ला सुरुवात होते आणि ५० वयात मेनोपॉज येतो. भारतातीय स्त्रियांना मेनोपॉज लवकर येतो. परंतु आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी मेनोपॉज नंतरही गर्भधारणा होऊ शकते.