अझोस्पर्मिया आणि पुरुष वंध्यत्व – कारणे, निदान आणि उपचार 

पुरुषांमध्येही वंध्यत्वाच्या अनेक समस्या असतात ज्या नैराश्य, तणाव आणि अपूर्णतेची भावना निर्माण करतात. त्यातील एक प्रमुख आणि गंभीर समस्या म्हणजे अझोस्पर्मिया (Azoospermia). पुरुषाच्या वीर्यात (Semen) शुक्रजंतू (Sperm) पूर्णतः अनुपस्थित असतील, तर त्याला अझोस्पर्मिया म्हणतात. साधारणतः 10 ते 15% पुरुष वंध्यत्वाच्या (Male Infertility) केसेसमध्ये अझोस्पर्मिया आढळतो. मात्र, योग्य निदान आणि उपचार घेतल्यास अझोस्पर्मियाची समस्या असलेल्या पुरुषालाही पितृत्वाचा आनंद मिळू शकतो. या ब्लॉग मध्ये आपण अझोस्पर्मियाची सविस्तर माहिती घेणार आहोत – यामध्ये त्याची कारणे, प्रकार, निदान पद्धती आणि उपचारांविषयी संपूर्ण माहिती दिली आहे.

Share This Post

azoospermia in marathi

अझोस्पर्मिया म्हणजे काय?

सामान्यतः पुरुषाच्या वीर्यात शुक्रजंतू असतात, जे गर्भधारणेसाठी आवश्यक असतात. मात्र, अझोस्पर्मियामध्ये वीर्यात शुक्रजंतू उपस्थित नसतात, ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा शक्य होत नाही. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, ज्यामध्ये आनुवंशिक (Genetic) घटक, हार्मोनल समस्या, अडथळे किंवा टेस्टीस (Testicles) संबंधित आजारांचा समावेश होतो.

अझोस्पर्मियाचे निदान सहसा नियमित वंध्यत्व तपासणीदरम्यान होते, कारण या स्थितीमध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.

अझोस्पर्मियाचे प्रकार

azoospermia types in marathi

अझोस्पर्मियाचे मुख्यतः दोन प्रकार असतात:

1) ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया (Obstructive Azoospermia)

या प्रकारामध्ये वीर्यवाहिन्यांमध्ये (Sperm Ducts) अडथळा निर्माण झाल्याने शुक्रजंतू बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे वीर्यात शुक्रजंतूंची अनुपस्थिती दिसते.

महत्वाची कारणे:

  • जन्मजात (Congenital) अडथळे
  • वंध्यत्वाशी संबंधित शस्त्रक्रिया (उदा. व्हॅसेक्टॉमी – Vasectomy)
  • प्रोस्ट्रेट किंवा टेस्टिसच्या इन्फेक्शनमुळे झालेले नुकसान
  • ट्रॉमा किंवा अपघातामुळे वीर्यवाहिन्यांना इजा होणे

2) नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया (Non-Obstructive Azoospermia)

या प्रकारात शुक्रजंतूंचे उत्पादनच होत नाही किंवा ते खूप कमी प्रमाणात तयार होतात. याचे मुख्य कारण म्हणजे टेस्टिसची कार्यक्षमता कमी होणे किंवा हार्मोनल असंतुलन.

महत्वाची कारणे:

  • हार्मोनल समस्या (FSH, LH, टेस्टोस्टेरॉनचे असंतुलन)
  • जन्मजात आनुवंशिक विकार (Klinefelter’s Syndrome)
  • टेस्टीसच्या कार्यातील बिघाड (Primary Testicular Failure)
  • किरणोत्सर्ग (Radiation) किंवा केमोथेरपी (Chemotherapy) मुळे झालेलं नुकसान

ही काही महत्वाची कारणं असली तरी काही केसेसमध्ये कारण स्पष्ट होत नाही, ज्याला Idiopathic Azoospermia असे म्हणतात.

हे देखील वाचा: स्पर्म ऍबनॉर्मलिटी म्हणजे काय?

अझोस्पर्मियाची कारणे (Causes of Azoospermia)

अझोस्पर्मिया होण्यामागे विविध शारीरिक, आनुवंशिक आणि पर्यावरणीय कारणे असू शकतात. ही समस्या पुरुषाच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे, वीर्यवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे किंवा शुक्रजंतूंच्या निर्मितीमध्ये अडथळा येत असल्यामुळे उद्भवू शकते. याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

1) जन्मजात समस्या आणि आनुवंशिक कारणे (Genetic & Congenital Factors)

काही पुरुषांमध्ये जन्मजात शुक्रवाहिन्या (Sperm Ducts) विकसित होत नाहीत, ज्यामुळे शुक्रजंतू बाहेर पडू शकत नाहीत. याला Congenital Bilateral Absence of Vas Deferens (CBAVD) म्हणतात. ही समस्या बहुतेक वेळा Cystic Fibrosis Gene Mutation मुळे होते. याशिवाय, Klinefelter’s Syndrome हा एक आनुवंशिक विकार आहे, ज्यामध्ये पुरुषामध्ये दोन X आणि एक Y असे अतिरिक्त गुणसूत्र असतात. यामुळे टेस्टिसच्या वाढीवर परिणाम होतो आणि शुक्रजंतूंचे उत्पादन अत्यंत कमी होते किंवा पूर्णतः थांबते. काही पुरुषांमध्ये Y Chromosome Deletion देखील आढळते, ज्यामुळे शुक्रजंतू निर्मिती होत नाही.

2) हार्मोनल असंतुलन (Hormonal Imbalance)

शरीरात शुक्रजंतूंचे उत्पादन होण्यासाठी मेंदूतील पिट्यूटरी ग्रंथी (Pituitary Gland) आणि हायपोथॅलॅमस (Hypothalamus) योग्य प्रमाणात हार्मोन्स स्रवतात. FSH (Follicle-Stimulating Hormone) आणि LH (Luteinizing Hormone) हे टेस्टिसला शुक्रजंतू निर्माण करण्यासाठी उत्तेजित करतात. जर या हार्मोन्सची पातळी कमी असेल, तर शुक्रजंतूंचे उत्पादन होत नाही. काही पुरुषांमध्ये हायपोथॅलॅमिक किंवा पिट्यूटरी डिसऑर्डर असतो, ज्यामुळे हार्मोन्सच्या प्रमाणात असंतुलन येते आणि अझोस्पर्मिया होतो.

3) vv (Blockage in Sperm Ducts)

ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मियामध्ये शुक्रवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे शुक्रजंतू वीर्यात मिसळू शकत नाहीत. हा अडथळा जन्मजात असू शकतो किंवा तो संसर्ग, इजा किंवा शस्त्रक्रियेमुळे निर्माण होऊ शकतो. पूर्वी झालेल्या नसबंदी (Vasectomy) किंवा इतर शस्त्रक्रियांमुळेही शुक्रवाहिन्या बंद होऊ शकतात. तसेच, प्रोस्टेट किंवा युरेथ्राच्या इन्फेक्शनमुळे (Infections like Epididymitis, Orchitis) शुक्रवाहिन्यांमध्ये ताठरपणा येतो आणि अडथळा निर्माण होतो.

4) टेस्टिसच्या कार्यातील समस्या (Testicular Failure)

टेस्टिसमध्ये शुक्रजंतूंचे उत्पादन थांबण्याची अनेक कारणे असू शकतात. जन्मतः काही पुरुषांमध्ये अनडिसेंडेड टेस्टिस (Undescended Testicles) असतात, ज्यामुळे योग्य तापमान मिळत नाही आणि शुक्रजंतू तयार होत नाहीत. काही पुरुषांमध्ये Primary Testicular Failure आढळतो, ज्यामध्ये टेस्टिस योग्यरित्या कार्य करत नाहीत. किरणोत्सर्ग (Radiation Therapy) किंवा केमोथेरपी (Chemotherapy) यांसारख्या उपचारांमुळे टेस्टिसवर परिणाम होतो आणि शुक्रजंतूंची निर्मिती बंद होते.

5) जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक (Lifestyle & Environmental Factors)

स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रग्स यांसारख्या सवयी शुक्रजंतूंच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम करतात आणि अझोस्पर्मियाला कारणीभूत ठरू शकतात. जास्त गरम वातावरणात राहणे, उदा. सॉना किंवा हॉट बाथ घेणे, टाइट कपडे घालणे यामुळे टेस्टिसचे तापमान वाढते आणि शुक्रजंतूंची निर्मिती प्रभावित होते. तणाव आणि असंतुलित आहार यामुळे देखील शुक्रजंतूंच्या प्रमाणावर परिणाम होतो.

हे देखील वाचा: वंध्यत्व म्हणजे काय? Infertility कारणे, लक्षणे आणि उपचार

अझोस्पर्मियाचे निदान कसे होते? (Diagnosis of Azoospermia)

अझोस्पर्मियाचे निदान करण्यासाठी डॉक्टर विविध चाचण्या करतात. या चाचण्यांद्वारे अझोस्पर्मियाचा प्रकार आणि त्यामागचे कारण समजते, जे उपचार निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

1) वीर्य चाचणी (Semen Analysis)

सर्वप्रथम, पुरुषाच्या वीर्याचे विश्लेषण (Semen Analysis) केले जाते. यासाठी 2-3 वेळा वेगवेगळ्या वेळी वीर्य नमुने घेऊन तपासणी केली जाते. जर वीर्यात शुक्रजंतू सापडले नाहीत, तर अझोस्पर्मियाचे निदान केले जाते.

2) रक्त तपासणी (Hormone Tests)

हार्मोनल असंतुलन हे अझोस्पर्मियाचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. म्हणूनच, रक्त तपासणीद्वारे FSH, LH, टेस्टोस्टेरॉन आणि प्रोलॅक्टिन यांसारख्या हार्मोन्सची पातळी मोजली जाते. जर FSH ची पातळी खूप जास्त असेल, तर टेस्टिस योग्यरित्या कार्य करत नसल्याचे संकेत मिळतात, ज्यामुळे शुक्रजंतूंचे उत्पादन थांबते किंवा अत्यंत कमी होते.

3) अल्ट्रासाऊंड आणि MRI (Scrotal Ultrasound & MRI)

शुक्रवाहिन्यांमध्ये अडथळा आहे का, टेस्टिसची रचना व्यवस्थित आहे का हे पाहण्यासाठी Scrotal Ultrasound किंवा MRI केली जाते. यातून ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया आहे की नाही हे समजू शकते.

4) टेस्टिक्युलर बायोप्सी (Testicular Biopsy)

जर वीर्यात शुक्रजंतू आढळले नाहीत, तर डॉक्टर टेस्टिसची बायोप्सी करतात. यात एक लहानसा नमुना काढून त्यामध्ये शुक्रजंतूंची उपस्थिती तपासली जाते. जर टेस्टिसमध्ये शुक्रजंतू असतील, तर त्यांना ICSI (Intracytoplasmic Sperm Injection) प्रक्रियेसाठी गोळा करता येते.

हे देखील वाचा: IVF म्हणजे काय? आयव्हीएफ उपचार आणि प्रक्रिया

अझोस्पर्मियाचे उपचार (Treatment of Azoospermia)

अझोस्पर्मियाचा प्रकार आणि कारणांवर आधारित विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत. योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास पितृत्वाचा आनंद घेणे शक्य आहे.

1) औषधोपचार (Medications & Hormone Therapy)

जर अझोस्पर्मियाचे कारण हार्मोनल असंतुलन असेल, तर डॉक्टर योग्य औषधोपचार सुचवतात. उदाहरणार्थ, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असल्यास ते वाढवण्यासाठी हार्मोनल थेरपी दिली जाते. काही प्रकरणांमध्ये Clomiphene किंवा hCG (Human Chorionic Gonadotropin) सारखी औषधे दिली जातात, जे शुक्रजंतू निर्मिती वाढवतात. इन्फेक्शनमुळे अझोस्पर्मिया झाल्यास अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो.

2) शस्त्रक्रिया (Surgical Treatment)

जर शुक्रवाहिन्यांमध्ये अडथळा असेल, तर शस्त्रक्रियेच्या मदतीने हा अडथळा दूर केला जातो. काही प्रकरणांमध्ये, वीर्यवाहिन्या परत जुळवण्याची (Vasectomy Reversal) शस्त्रक्रिया केली जाते.

3) शुक्रजंतू पुनर्प्राप्ती तंत्र (Sperm Retrieval Techniques)

जर वीर्यात शुक्रजंतू नसले, पण टेस्टिसमध्ये त्यांचे उत्पादन होत असेल, तर त्यांना विशेष पद्धतींनी काढले जाते. यामध्ये TESA (Testicular Sperm Aspiration), PESA (Percutaneous Epididymal Sperm Aspiration), MESA (Microsurgical Epididymal Sperm Aspiration), आणि TESE (Testicular Sperm Extraction) यांचा समावेश आहे. नंतर, काढलेले शुक्रजंतू IVF-ICSI प्रक्रियेसाठी वापरले जातात.

4) जीवनशैलीतील बदल (Lifestyle Modifications)

संतुलित आहार, व्यायाम, धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहणे यामुळे शुक्रजंतूंची गुणवत्ता सुधारू शकते. तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करावा.

हे देखील वाचा: स्पर्म ऍबनॉर्मलिटी म्हणजे काय?

निष्कर्ष –

अझोस्पर्मिया ही गोंधळात टाकणारी आणि मानसिक तणाव देणारी समस्या असली तरी, आज यावर विविध उपचार उपलब्ध आहेत. योग्य निदान आणि वैद्यकीय सल्ल्याने वंध्यत्वावर मात करून पितृत्वाचा आनंद मिळवता येतो.

जर आपल्याला अझोस्पर्मियाशी संबंधित अधिक माहिती हवी असेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

bollywood celebrities who did ivf in marathi
Blog

प्रसिद्ध बॉलीवूड सेलेब्रिटी ज्यांनी IVF द्वारे बाळांना जन्म दिला

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जोडप्यांना बाळ होण्यासाठी अडचणी येतात. काहींना नैसर्गिकरित्या बाळ होत नाही, तर काहींना वय, तब्येत किंवा इतर कारणांमुळे थोडा जास्त वेळ लागतो. पण विज्ञानाने या समस्येवर एक उपाय शोधला आहे, आणि त्याला म्हणतात IVF, म्हणजेच In Vitro Fertilization.