फायब्रॉईड : स्वरूप, लक्षणे, कारणे आणि उपचार

फायब्रॉईड म्हणजे मसल्स आणि कनेक्टीव्ह टिश्यूज यांपासून तयार झालेली गर्भाशयातील गाठ. फायब्रॉईड वेगवेगळ्या प्रकाराचे आणि वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात. फायब्रॉईडची समस्या प्रजनन क्षमतेवर आणि गर्भधारणेवर परिणाम करू शकते. याच फायब्रॉईड विषयी, त्याची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपचारांविषयी थोडक्यात माहिती घेऊया.

Share This Post

फायब्रॉईड म्हणजे मसल्स आणि कनेक्टीव्ह टिश्यूज (ज्याला स्मूथ टिश्यू असेही म्हणतात) यांपासून तयार झालेली गर्भाशयातील गाठ. शरीरातील स्त्री हार्मोन्समधील बदलामुळे अशा प्रकारच्या गाठी तयार होतात. त्यामुळे फायब्रॉइडचं प्रमाण प्रजननशील महिलांमध्ये जास्त दिसून येतं. या गाठी तयार होणं सामान्य असलं तरी याबाबत अनेक समज-गैरसमज पसरलेले पाहायला मिळतात.

20 ते 45 वयोगटातील प्रजननक्षम महिलांमध्ये फायब्रॉईड्स होण्याची शक्यता जास्त असते. मासिक पाळी लवकर आल्यास किंवा रजोनिवृत्ती (मेनोपॉज) उशीरा आल्यासही फायब्रॉईड होण्याची शक्यता असते. अविवाहित स्त्रिया, वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या स्त्रिया आणि एकच मूल असलेल्या स्त्रियांमध्ये फायब्रॉईड्स जास्त प्रमाणात आढळून येतात. काही स्त्रियांमध्ये अगदी लहान वयापासून म्हणजे वयाची वीस वर्षे पूर्ण होण्याच्या अगोदरच फायब्रॉईडच्या गाठी गर्भाशयामध्ये वाढीला लागलेल्या दिसतात. फायब्रॉइड हा ९९ टक्के कॅन्सरशी संबंधित नसतो.

फायब्रॉइड्स कशामुळे होतो?

फायब्रॉइड्स कशामुळे होतो याची नेमकी कारणं अजून कुणीच ठामपणानं सांगितलेली नाहीत, मात्र खालील काही स्थितींमध्ये फायब्रॉईड तयार होण्याची शक्यता वाढते असं वैद्यकीय संशोधकांचं मत आहे.

  • हार्मोन्समधील बदल (इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण)
  • वेगवेगळ्या प्रकारची ग्रोथ, उदा. इन्सुलिनचं प्रमाण
  • अनुवांशिकता
  • इसीएम (एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स)

मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, या गाठी गर्भाशयात का वाढतात, का संकुचित होतात याची कुठलीच नेमकी कारणं सांगता येत नसली तरी त्यांच्या निर्मितीचं मुख्य कारण संप्रेरकांमध्ये (हार्मोन्समध्ये) होणारा बदल हे आहे. गर्भधारणेच्या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारख्या हार्मोन्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं, अशावेळी जी अँटिहार्मोनल औषधं दिली जातात त्यामुळे हार्मोन्स आक्रसली जातात. रजोनिवृत्तीच्या दरम्यानही हेच घडतं. फायब्रॉइड्स तयार होण्यामागचं आणखी एक कारण मूलपेशी (स्टेम सेल्स). गर्भाशयाच्या मांसल भागात मूलपेशी असतात. या मूलपेशी वेगाने विघटित होतात व पेशींच्या भोवती गुळगुळित आवरण तयार करून राहतात. त्यातून फायब्रॉइड्स चा आजार वाढत जातो.

फायब्रॉइडचे प्रकार

गर्भाशयाची तीन आवरणं असतात. बाहेरील आवरण सेरस, मधले मस्क्युलर आणि आतील आवरण म्हणजे म्युकस किंवा एन्डोमेट्रिअम. याशिवाय सेरस व मस्क्युलर यामधील भाग म्हणजे सबसेरस. एन्डोमेट्रिअम व मस्कुलरमधला भाग म्हणजे सबम्युकस.

फायब्रॉइडची गाठ ज्या आवरणातून तयार होते, त्या आवरणाप्रमाणे फायब्रॉइडचं वर्गीकरण केलं जातं. महिलांमध्ये दिसणारी फायब्रॉइडची लक्षणे आणि होणाऱ्या त्रासाची तीव्रता फायब्रॉइडच्या उगमस्थानानुसार बदलत जाते. फायब्रॉइडवरील उपचार पद्धतीही त्याच्या उगमस्थानाप्रमाणे ठरवली जाते.

फायब्रॉइडचे सबसेरस (गर्भाशयाच्या बाहेरील आवरणाखालून), इन्ट्राम्युरल (गर्भाशयामधील स्नायूतील आवरणातून),  सबम्युकस (गर्भाशयाच्या आतील आवरणाखालून) आणि पेडूनक्युलेटेड असे चार मुख्‍य प्रकार आहेत.

• इंट्राम्युरल फायब्रॉईड्स (Intramural Fibroids) – गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये या फायब्रॉईड्ची निर्मिती होते. सामान्यत: याच जागेत गाठी तयार होतात.

• सबसेरस फायब्रॉईड्स (Subserous Fibroids) – या गाठी गर्भाशयाच्या बाहेर तयार होतात.

• सबम्युकस फायब्रॉईड्स (Submucous Fibroids) – या गाठी गर्भाशयाच्या मध्यभागी तयार होतात.

• पेडूनक्युलेटेड फायब्रॉईड्स (Pedunculated Fibroids) – या गाठी गर्भाशयाच्या बाजूला तयार होतात.

फायब्रॉइडची लक्षणं

गाठी कुठं आणि किती आहेत, त्यांचा आकार केवढा आहे यावर लक्षणं अवलंबून आहेत. काही स्त्रियांमध्ये तर लक्षणं आढळतंच नाहीत. तरीही बहुतांश स्त्रियांना जाणवणारी लक्षणं खालीलप्रमाणे आहेत.

  • मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्राव व प्रचंड वेदना
  • कंबरदुखी व पायांमध्ये वेदना
  • मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वाढ
  • बद्धकोष्ठता
  • ओटीपोटात भरून येणं
  • शारीरिक संबंधांच्या वेळी वेदना होणं
  • पोटात मळमळ होणं
  • पाठीच्या खालच्या भागात वेदना होणं

फायब्रॉईडचा गर्भधारणेवर होणारा परिणाम

अनेकदा प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. अशा वेळेस सुरुवातीलाच डॉक्टर ट्रान्स व्हजायनल सोनोग्राफी करून नेमकी समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. तेव्हा फायब्रॉईड (गर्भशायात गाठ) असल्याचे समजते. याशिवाय इतर काही केसेस मध्ये प्रेग्नेंसी दरम्यान केलेल्या सोनोग्राफी मध्ये फायब्रॉईड असल्याचे निदान होते. अशावेळी घाबरून जाण्याचे काही कारण नाही; फायब्रॉईड मुळे गर्भधारणा होत नाही, असे अजिबात नाही. फायब्रॉईड असेल तरी गर्भधारणा होऊ शकते. फायब्रॉईड कुठे आहे यावर ते अवलंबून असते.

कधीकधी गर्भधारणेनंतर फायब्रॉइड्स देखील आकाराने वाढू लागतात. फायब्रॉइड्स आकाराने मोठे असल्यास बाळाची वाढ रोखली जाते. यामुळे जन्माला येणारे बाळ सव्यंग असण्याची शक्यता वाढते. अगदी काहीच केसेस मध्ये फायब्रॉईड मुळे प्री-टर्म (वेळेपूर्वी) डिलिव्हरी किंवा सी-सेक्शन (सिजेरियन) डिलिव्हरी चा धोका असतो. त्यामुळे गर्भधारणा असल्यास डॉक्टर्स तुमच्या फायब्रॉईड चे वेळोवेळी निरीक्षण (monitor) करतात.

फायब्रॉईडचे निदान

योनीमार्गाची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर फायब्रॉईड्सची माहिती मिळते. फायब्रॉईडचा प्रकार आणि त्याचे नेमके स्थान निश्चित करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात –

  • अल्ट्रासाऊंड – या चाचणी मध्ये ध्वनी लहरींचा वापर होतो. यामुळे गर्भाशयाचे चित्र स्पष्ट होते आणि त्यातील फायब्रॉईडची माहिती घेण्यात येते.
  • MRI– फायब्रॉईडच्या गाठीचा नेमका आकार आणि त्यांचं स्थान याद्वारे तपासलं जातं.
  • हिस्टरेस्कोपी– यामध्ये मेडिकल एक्सपर्ट गर्भाशयाच्या मुखातून टेलिस्कोप गर्भाशयात नेतात आणि गर्भाशयाची तपासणी करतात.

फायब्रॉईड्स वरील उपचार

फायब्रॉईड्सची संख्या जास्त आहे, त्यांचा आकार मोठा आहे किंवा त्यामुळे मासिक पाळीदरम्यान खूप त्रास होत आहे, यापैकी कोणतीही स्थिती उद्भवल्यास शस्त्रक्रिया करून या गाठी काढाव्या लागतात.

फायब्रॉईड्सवरील उपचारांमध्ये मायमेक्टॉमी आणि हेस्टरेक्टॉमी या दोन प्रमुख शस्त्रक्रिया आहेत.

  • मायमेक्टॉमी– फायब्रॉईड्सचा सामना करणाऱ्या महिलांनाही भविष्यात आपल्याला मूल व्हावं असं वाटत असतं, अशा वेळी स्त्रीरोग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मायमेक्टॉमी करून गर्भाशय आणि गर्भाशयाच्या भिंतींवरील गाठी काढून गर्भाशय तसंच ठेवलं जातं. पण ही शस्त्रक्रिया प्रत्येकवेळी शक्य असतेच असं नाही.
  • हेस्टरेक्टॉमी– फायब्रॉईड्ससाठी ही सामान्यत: केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. यात महिलेचं गर्भाशय काढून टाकण्यात येतं.

गर्भाशयातील गाठी या सामान्यतः प्रजननक्षम वयातील स्रियांमध्ये आढळून येत असल्या तरी त्या रजोनिवृत्तीच्या काळातही होऊ शकतात आणि त्यांचा बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो. तुम्हाला या गाठींमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तुमच्या डॉक्टरशी बोला आणि तुमच्यासाठी शस्त्रक्रिया हा योग्य पर्याय आहे का याबद्दलही चर्चा करा. जर गाठींचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसेल, तर कसल्याही उपचाराची आवश्यकता नसते.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।

Essential Nutrients Your Body Needs When Pregnant

During pregnancy, you provide all of the nutrition your baby requires. As a result, you may need more nutrients in your body while you’re pregnant. Taking prenatal vitamins and eating healthy foods will help you get all the nutrients you and your baby require throughout your pregnancy.